Language

अंगुर / द्राक्ष

द्राक्षवेलींची लागवड, छाटणी आणि पानांचे व्यवस्थापन :-
 द्राक्षवेलीला चांगल्या आधाराची गरज असते. त्याचबरोबर योग्य प्रमाणात वेलींवर पाने असावीत वेलींना वळण देणे महत्वाचे आहे. वेळींभोवती सूक्ष्म वातावरण निर्माण करणे चांगल्या वाढीसाठी आवश्यक असते. पानांचे नियोजन हि सर्वात महत्वाची बाब आहे. यामुळे वेलींचे व्यवस्थापन योग्य राहते. उत्पादन क्षमता व गुणवत्ता वाढीसाठी पानांचे नियोजन करावे. सूर्यप्रकाश, हवामान, तापमान, या गोष्टी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी महत्वाच्या आहेत.
वेलींचे व्यवस्थापन (कॅनोपी मॅनेजमेंट):-
 वेलींचे व्यवस्थापन योग्य त्या वेळी होणे फायद्याचे ठरते. त्यासाठी कुशल मजुरांकडून वेलींची निगा ठेवावी. छाटणी, एकसारख्या फांद्या, काड्या तयार कराव्यात. वेलींचे व्यवस्थापन करताना खालील गोष्टींवर लक्ष द्यावे. ट्रेनिंग हि अतिशय महत्वाची गोष्ट आहे. वेलींचे तसेच पानांचे योग्य व्यवस्थापन केल्यास प्रकाशसंश्लेषण क्रिया योग्य रीतीने होते. वेलीमध्ये घडाच्या विकासाकरिता आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची साठवणूक होते. लवकर डोळे फुटण्यास मदत होते. यांत्रिकिरणामुळे वळण पद्धतीमध्ये सुधारणा होत आहे, तसेच छाटणी करण्यास मदत मिळत आहे. ट्रेनिंग पद्धतीचे योग्य नियोजन केल्यास जास्तीत जास्त घडांचे नियोजन करता येते. यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये वाढ होते.
खुंटरोपांचे योग्य व्यवस्थापन :-
 खुंटरोप लागवडीच्या ५० ते ६० दिवसानंतर जुनी काडी व मुलांचा विकास पूर्ण झालेला असतो. अशा वेळी जमिनीपासून १ ते २ डोळे राखून संपूर्ण फुटी काढून टाकाव्यात. यानंतर निघालेल्या फुटींमध्ये रोगमुक्त जोमदार सरळ वाढण्याऱ्या फुटी बांबूला सुतळीच्या साहाय्याने बांधून बाकीच्या सर्व फुटी काढाव्यात. यामुळे तयार झालेले अन्नद्रव्य फक्त निवडलेल्या कड्यांमध्ये जाते.
छाटणी :-
 छाटणी म्हणजे अनावश्यक असणाऱ्या फांद्या किंवा काड्या काढणे. ज्या फांद्यातून घडनिर्मिती होते अश्या सशक्त काड्या ठेवाव्यात.
पानांचे व्यवस्थापन :-
  कॅनोपी व्यवस्थापन हे प्रत्येक हंगामासाठी वेगळे असते. आदर्श कॅनोपी व्यवस्थापनामुळे चांगल्या प्रतीचे जास्तीत जास्त उत्पादन मिळते. पानांचे व्यवस्थापन हे प्रामुख्याने वेलींचा वाढ, विविध आकार, निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीसाठी महत्वाचे आहे.
पानांचे नियोजन करताना :-
  योग्य नियोजन राहिल्यास येणाऱ्या घडाचे वजन पेलण्यास मदत होते. बागेत समस्या निर्माण होत नाहीत. फळधारक काड्यांची निर्मिती जास्त प्रमाणात होते. पानांचे योग्य व्यवस्थापन राखल्याने सूर्यप्रकाश व मोकळी हवा खेळती राहते, घडाचे संरक्षण होते. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळते. प्रत्येक पानाला एकसारखा सूर्यप्रकाश मिळाल्याने योग्य प्रमाणात अन्ननिर्मिती होते. फवारणी करताना बुरषीनाष, कीटनाशक प्रत्येक पानांपर्यंत योग्य प्रमाणात पोचते. बागेत आद्रता पुरेशा प्रमाणात राहते, त्यामुळे वेली रोगास बळी पडत नाहीत.
फळछाटणी (ऑक्टोबर छाटणी )नंतर कॅनोपी (पानांचे व्यवस्थापन :-
  फळछाटणी करण्याअगोदर एका इक्रामधून वेगवेगळ्या जाडीच्या काड्या निवडाव्यात, त्याचे परीक्षण सूक्ष्मदर्शकाखाली करावे. त्यामुळे फळधारक डोळ्यांचे प्रमाण लक्षात येते. त्यामुळे जास्तीत जास्त घडनिर्मितीस मदत होते. छाटणी करतेवेळी सहा मिमी पेक्षा कमी जाडी असणाऱ्या काड्या काढून टाकाव्यात. त्यानंतर पूर्ण काडीला हायड्रोजन साईनामाईडचे पेस्टींग न करता केवळ वरील तीन डोळ्यांना पेस्टींग करावे, जेणेकरून एकसारख्या फुटी निघण्यास मदत होईल. डोळे फुटल्यानंतर ४ ते ५ अवस्थेमध्ये कमी वाढ असलेल्या फाद्यांची विरळणी करावी. सरासरी १-१. फूट इतक्या अंतरावर एक घड या प्रमाणात कॉनॉपीचे व्यवस्थापन करावे. फांद्या जास्त असल्यास ४ ते ५ पानांच्या अवस्थेमध्ये विरळणी करावी. घड संख्या जास्त प्रमाणात असेल तर फुलोरा अवस्थेच्या अगोदर घड कमी करावेत. एका काडीवर दोनच फांद्या ठेवाव्यात. जर काडीची जाडी आठ मिमीपेक्षा कमी असेल तर एक काडीवर एकच फांदी ठेवावी. मणी सेटिंगनंतर फळ छाटणीच्या एक महिन्याने पाणी व स्फुरद वेळीस द्यावे. मण्याची विरळणी करताना जास्तीत जास्त मण्याची विरळणी करावी, त्यामुळे मण्याचे आकारमान वाढते. घडावर सावली टिकून राहील अशी फांद्याची दिशा ठेवावी. निर्यातक्षम घडनिर्मितीसाठी १०० ते १२० इतके एकसारख्या आकारचे मणी ठेवावेत. लहान व रोगग्रस्त आकारचे मणी कात्रीच्या साहाय्याने काढून टाकावेत. घडाच्या पुढे १० ते १२ पाने राहतील असे व्यवस्थापन करावे. जेणेकरून अन्नद्रव्याची स्पर्धा होणार नाही, अन्नद्रव्याचा अपव्यय होणार नाही. निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीमध्ये संजीवकाव्यतिरिक्त गर्डलिंगचा वापर केल्यास किमान एक मिमी इतका मणी आकार वाढलेला दिसतो. साधारण गर्डलिंग वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या वेळेत करतात, थॉम्पसन सीडलेसमध्ये मण्याचे आकारमान ४ ते ६ मिमी असताना तर शरद सिडलेसमध्ये ६ ते ८ मिमी असताना गर्डलिंग करावे.
पाणी व्यवस्थापन :-
खरड छाटणी :
 द्राक्षवेलीची पाण्याची गरज हि साधरणतः धराडे छाटणी ते घडनिर्मिती यादरम्यान (मध्य एप्रिल ते मे महिना ) जास्त असते. वातावरणात तापमान जास्त असल्यामुळे या वेळी पाण्याची पूर्तता महत्वाची आहे. कारण या वेलीच्या पाण्याच्या व्यवस्थापनामुळे घडनिर्नितीकरिता आवश्यक असलेली कॅनोपी तयार होईल. काडीच्या आवश्यक असलेल्या जाडीकरिता (८ ते १० मी.मी ) जाडीकरिता या वेळी ३३,६०० ते ५०,४०० लिटर पाणी प्रतिहेक्टरी प्रतिदिवस द्यावे. घडनिर्मितीच्या कालावधीमध्ये वेलीची पाण्याची गरज हि ११,२०० ते १४,००० लिटर पाणी प्रतिहेक्टरी प्रतिदिवस असते. काडीच्या परिपकवतेच्या काळात पाऊस सुरे असतो. परंतु प्रत्येक ठिकाणी एकसारखा पाऊस नसल्यामुळे या वेळी वेलीस ० ते ८४०० लिटर पाणी प्रतिहेक्टरी प्रतिदिवसाप्रमाणे द्यावे.
फळछाटणी :-
 ऑक्टोबर महिन्यात फळछाटणी घेतली जाते. या वेळी डोळे चांगले फुटून बागेत पुरेशी कॅनोपी मिळण्याकरिता २५,२०० ते ३३,६०० लिटर पाणी प्रतिहेक्टरी प्रतिदिवसाप्रमाणे द्यावे. बागेत चांगले थिनिंग व मणी सेटिंग होण्यासाठी ५,६०० ते ८,४०० लिटर पाणी प्रतिहेक्टरी प्रतिदिवस याप्रमाणे द्यावे. मणी सेटिंग ते पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यंत मन्यामधील पेशींची विभागणी व वाढ होत असल्यामुळे वेळीस पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. या वेळी वेलीस १२,६०० ते २५,२०० लिटर पाणी प्रतिहेक्टरी प्रतिदिवस द्यावे. पाणी उतरण्याची अवस्था ते फळकाढणीदरम्यान वेळीस जास्त पाण्याची गरज नसते. यामुळे मणी चिरण्याची समस्या निर्माण होते. फलकाढणीस उशीर होतो. तेव्हा या कालावधीमध्ये ३३,६०० ते ४२,००० लिटर पाणी प्रतिहेक्टरी प्रतिदिवसाप्रमाणे द्यावे.
टीप :
  वर दिलेली पाण्याची गरज हि मार्गदर्शक म्हणून आहे. बागेतील वातावरण, जमिनीची परिस्थिती व आपल्या बागेतील व्यवस्थापनानुसार ती बदलेल.
फळछाटणी :-
 फळछाटणीच्या वेळी किंवा त्यापूर्वी २५ टन प्रतिहेक्टरी शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. फळछाटणी ते फुटीच्या वाढीच्या कालावधीत ८० केली नत्र प्रतिहेक्टरी ठिबकद्वारे द्यावे. डोळा फुगल्याच्या अवस्थेपासून सूक्ष्म अन्नद्रव्ये (जस्त, लोह, मॅग्नेनीज, बोरॉन ) द्यावीत. माती परीक्षणातून मॅग्निशियमची कमतरता आढळून आल्यास त्याची पूर्तता करावी. स्फुरदच्या पूर्ततेकरिता शेणखतासोबत सुपर फॉस्फेट हे छाटणीदरम्यान द्यावे. फुटीची चांगली वाढ होण्याचा द्रुष्टीने शिफारशीनुसार झिंक आणि बोरॉन २० ते ४० दिवसांच्या कालावधीत द्यावे. शक्यतोवर हि मात्र फवारणीद्वारे द्यावी. देठ परीक्षण केल्यास वेलीची सध्याची स्थिती काय आहे हे समजते. फळछाटणीनंतर ४० ते ७० दिवसांच्या कालावधीत (फुलोरा ते मणी सेटिंग ) ७१ किलो स्फुरद प्रतिहेक्टरी द्यावे. वेळीस पुन्हा २५ किलो सल्फेट ऑफ पोटॅश द्यावे. पालाशची कमतरता आढळून आल्यास ३ ते ५ ग्राम पोटॅशियम सल्फेट प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मण्याची वाढ ते पाणी उतरण्याची अवस्थांपर्यंत ८० किलो नत्र आणि ८० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. मान्यता पाणी उतरण्याच्या अवस्थेपासून फलकाढणीदरम्यान ८० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे, या वेळी ०.५ टक्के मॅग्नेशियमची फवारणी करावी. बागेतील वातावरणातील झालेल्या बदलांमुळे ( थंडी किंवा पाऊस ) किंवा अन्नद्रव्यांचा असमतोल झाल्यामुळे मण्यांमध्ये कॅल्शियमची कमतरता आढळून येते. अशा परिस्थितीत कॅल्शियम क्लोराइड किंवा कॅल्शियम नायट्रेटची ०.३ ते ०.५ टक्के या प्रमाणात फवारणी करावी किंवा घड बुडवावेत.