Language

ज्वारी

हवामान आणि जमीन :
 ज्वारी हे सरासरी ५०० ते ९०० मि. मी. पावसाच्या भागात घेतले जाणारे पावसाचा ताण सहन करणारे पीक आहे. पोटरीअवस्था ते पोटरीतून कणीस बाहेर पडेपर्यंतचा काळ पावसाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो. याउलट दाणे पव्क होण्याच्या अवस्थेत पावसाचे प्रमाण कमी असायला हवे. अन्यथा दाणे पावसात सापडून बुरशी रोगाने काळे पडतात. यासाठी ज्वारीची वेळेवर काढणी आणि बुरशी रोगास प्रतिबंधक असणाऱ्या जातीची निवड करावी. ज्वारी पिकास माध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन चांगली असते. जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा.
पूर्व मशागत :-
 उन्हाळ्यामध्ये एकदा नांगरणी करून २ ते ३ उभ्या, आडव्या वखराच्या पाळ्या कराव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी १२- १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
पेरणीचा कालावधी :-
 नैऋत्य मौसमी पाऊस झाल्याबरोबर वापसा येताच पेरणी करावी. जूनच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात पेरणी करावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन ताटाची संख्या घटते. उशिरा पेरणी करताना खोडमाशी नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (७० टक्के ) या कीटकनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
बियाणे व पेरणी :-
 पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. हेक्टरी ७.५ किलो संकरित व १० किलो सुधारित बाणाचे बियाणे पुरेसे होते. पेरणीसाठी मोहरबंद व प्रमाणित बियाणे वापरावे. जर शेतकरी स्वतःचे बियाणे वापरणार असतील तर त्यांनी पेरणीपूर्वी बियाणे निवडून घ्यावे. थायरमची प्रक्रिया ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात करावी. दोन ओळीतील अंतर ४५ सें. मी. तर दोन रोपांतील अंतर १५ सें. मी. ठेवावे. हेक्टरी रोपांची संख्या १ लाख ८० हजारापंर्यंत ठेवावी.
आंतरमशागत:-
 खरीप हंगामात ताणाचा प्रादुर्भाव जास्त असतो. पेरणीनंतर ४०-४५ दिवसांपूर्वी या काळात दोन खुरपण्या व दोन कोळपण्या कराव्यात. अट्राझीन हे तणनाशक हेक्टरी एक किलो प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून पेरणी नंतर परंतु बियाणे उगवण्यापूर्वी जमिनीवर फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन :-
 खरीप हंगामात ज्वारीला पाणी देण्याची गरज भासत नाही, परंतु पावसाचा टॅन पसल्यास संवेदनशील अवस्थेत एखादे संरक्षित पाणी द्यावे.
कापणी व मळणी :-
 कंसाचा दांडा पिवळा झाला, आतल्या भागीतील दाणे टणक झाले व दाण्याचा खालच्या भागावर कला ठिपका आला म्हणजे ज्वारीचे पीक शारीरिक द्रुष्टया पव्क झाले आहे असे समजावे. अशा वेळेस दाण्यामध्ये सर्वसाधारणपणे २५-३० टक्के ओलाव्याचे प्रमाण असावे.ज्वारीच्या पिकाची शारीरिक पव्क अवस्थेत (८-१० दिवस पूर्ण पव्कतेच्या अगोदर ) कंपनी केल्यास उत्पादनात घाट न होता बुरशी रोगापासून बचाव होतो. कापणी उशिरा केल्यास पीक उशिरा येणाऱ्या पावसात सापडण्याची शक्यता असते. साठवणुकीत धान्य चांगले राहण्यासाठी धान्यात ओलाव्याचे प्रमाण ९-१० टक्के असावे. त्यासाठी मळणी नंतर धान्य उन्हात वाळवून मगच साठवण करावी.